Welcome to Sports Vishwa

Friday, November 23, 2018

भारताचे अंतिम फेरीचे स्वप्न धुळीस, इंग्लंड विजयी

एंटिग्वा,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
आयसीसीच्या महिला टी-टवेन्टी विश्‍वचषक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना सर विवियन रिचर्डस स्टेडियम, एंटिग्वा येथे झाला. भारतीय संघातून अनुभवी मिताली राजला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. भारताने इंग्लंडला 113 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडने 2 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहजतेने पार केले.
भारताच्या 113 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. टॅमी ब्युमोंट केवळ 1 धावेवर बाद झाली. त्यानंतर डॅनियल वायटही 8 धावा करुन बाद झाली. 5 षटकांत इंग्लंडची 2 बाद 24 धावा अशी होती. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या अ‍ॅमी जोन्स आणि नतालिया स्किवर यांनी अभेद्य 92 धावांची भागीदारी करत विजय साजरा केला. अ‍ॅमी जोन्सने 42 चेंडूत 51 धावा केल्या तर, नतालिया स्कीवरने 43 चेंडूत 54 धावांची खेळी केली. अ‍ॅमी जोन्सला मॅन ऑॅफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. विजयासह इंग्लंड अंतिम फेरीत पोहचला असून त्यांचा सामना ऑॅस्ट्रेलियाशी होणार आहे.
भारताकडून गोलंदाजीत दिप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी 1-1 विकेट घेतली.
भारताची सुरुवात चांगली झाली. स्मृती मंधाना आणि तानिया भाटीयाने पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना 34 धावा करुन बाद झाली. त्यानंतर तानिया भाटीयाही 11 धावा करुन बाद झाली. भारताच्या 14 षटकांत 89 धावांवर 3 बाद अशा सुस्थितीत होता. यानंतर क्रिस्टी गोर्डनने 16 षटकात वेदा कृष्णमूर्ती 2 धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर 16 धावा यांना बाद केले. यानंतर तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करत इंग्लंडने भारताला 19.3 षटकांत 112 धावांत सर्वबाद केले. भारताचे शेवटचे 7 फलंदाज केवळ 23 धावांत बाद झाले.
इंग्लंडकडून कर्णधार हीथर नाईटने चांगली गोलंदाजी करताना 2 षटकांत 9 धावा देत 3 बळी घेतले. तर, सोफी एक्केलस्टोन आणि क्रिस्टी गोर्डनने 2-2 बळी घेतले.
भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, जेमिमा रोड्रिगेज, वेदा कृष्णामूर्ति, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, डायलन हेमलता, अरुंधति रेड्डी.
इंग्लंड संघ
हीथर नाइट (कर्णधार), टैमी ब्युमोंट, सोफिया डंकले ब्रॉउन, सोफी एक्केलस्टोन, क्रिस्टी गोर्डन, डॅनियल हेजल, अ‍ॅमी एलेन जोन्स, नतालिया स्कीवर, अन्या श्रबसोले, डेनियल वायट, लॉरेन विनफील्ड.

No comments:

Post a Comment